Home श्री बालोपासना श्री सिद्धिविनायक

देवीची रूपे: नव दुर्गा !!


शैलपुत्री
पहिले रूप आहे-शैलपुत्री.शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या,मुलगी.देवीच्या या रुपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते.भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर,निडर आणि शांत होण्यास मदत होते.


 ब्रह्मचारिणी

ब्रम्हचर्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते.ब्रम्हचर्याला एक विशिष्ट अर्थ देखील आहे , “आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे,आपण म्हणजे निव्वळ शरीर नाही तर आपण ज्योती स्वरूप आहेया सजगतेसह जीवन जगत असाल तेंव्हा तुम्ही ब्रम्हचर्यात असता.
जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल.जितके तुम्ही अनंत चेतनेला अनुभवाल तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल-हे ब्रम्हचर्य होय.
आपण देवीच्या या रुपाची आराधना करतो तेंव्हा आपल्या मध्ये ब्रम्हचर्याचे गुण जागृत होऊ लागतात.आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते,जो आपला मूळ स्वभाव आहे.आणि जेंव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेंव्हाच आपण शूर,निडर,पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो.



 चंद्रघंटा

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रुपाची आराधना केली जाते.या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात.चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते.चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते.देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते.
जेंव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेंव्हा आपले मन,आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे.



कूष्माण्डा

कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते.हे पुनरुत्पादनाचे,निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे.हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे.कुश्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे.ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते.




स्कंदमाता

स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे.बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे.सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे.
स्कंद म्हणजे तज्ञ,निष्णात.सामान्यपणे जे तज्ञ,प्रविण असतात ते उद्धट असतात. पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे.
देवीच्या या रुपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात.


कात्यायनी

देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत.कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात.विवाह म्हणजे संरक्षण,वचनबद्धता, सहजीवन आणि आपलेपणा.हि देवी नातेसंबंधामध्ये गरजेच्या या उच्च गुणांची प्रतिक आहे.
आत्म्याशी एकरूप होणे हा सच्चा नातेसंबंध होय.

कालरात्रि

काल म्हणजे वेळ,समय.काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे.रात्री म्हणजे गाढ विश्रांती,शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती.विश्रांती शिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो कां?कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती.


महागौरी

गौर म्हणजे गोरा,सफेद.सफेद रंग शुद्धतेचे प्रतिक आहे.शुद्धता निरागसतेमधून येते.महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागसता यांचा मिलाफ.महागौरीच्या आराधनेने ती आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते.
  
सिद्धिदात्री

जी सर्व सिद्धी देते ती सिद्धीधात्री.जे हवे आहे,जे गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी, मागण्यापूर्वी आणि अपेक्षेपेक्षा,गरजेपेक्षा ज्यादा मिळणे म्हणजेसिद्धी’.साधकाला अध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात.जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील.
तुम्ही स्व मध्ये स्थिर असाल तेंव्हाच तुम्हाला सच्च्या ज्ञानाची प्राप्ती होईल,तेंव्हाच समतोल ढळण्याची खात्री असेल.गुरुपरंपरेला येथे खूप महत्व आहे.साधकाने गुरुपरंपरेच्या ज्ञानमार्गावरच वाटचाल करावी.सिद्धीधात्री सर्व इच्छापुर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते.गुरुकृपेमुळेप्राविण्य आणि मुक्तीया सिद्धीधात्रीने दिलेल्या देणग्या आहेत.  

No comments:

Post a Comment